• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    संत नामदेव

    संत नामदेवांचा जन्म,प्रभव नाम संवत्सर,शके ११९२(इ.स.१२७०)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस,रोहिणी नक्षत्रास,रविवारी झाला,सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव होय.दामाशेटी हे संत नामदेवांच्या वडीलांचे तर गोणाई हे त्यांच्या आईचे नाव होते. नामदेवांचे आई-वडील दोघेही विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते.असे म्हणतात की गर्भात असताना नामदेव विठ्ठलनामाचा जप करत असल्यामुळें त्याच्या मातेलाहि विठ्ठलनामाचेच डोहाळे होत होते.

    लहान वयातच नामदेव कीर्तने करीत,पण नामदेवाने गुरुपदेश घेतला नसल्यामुळे ज्ञानेश्वरांनी त्याला सांगितले की नामदेवा, तू गुरुपदेश घेतल्याशिवाय तुला पूर्ण ज्ञान प्राप्त होणार नाही.संत गोरोबांकडे, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतमंडळी ब्रह्मज्ञान विषयक चर्चा करीत असताना ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबांनी उपस्थितांची आध्यात्मिक तयारीविषयी परीक्षा करविली असताना नामदेव एकटेच कच्चे ठरले,तेव्हा नामदेवाना गुरूचे खरे महत्व कळाले व त्यांनी विठोबा खेचरांना आपले गुरू केले.
    namdeo


    संत नामदेवांच्या अभंगगाथेतील सुमारे २५०० अभंग प्रसिद्ध आहे.तसेच त्यांचे हिंदी भाषेतही अभंग प्रसिध्द आहेत.संत नामदेवांचे साठ अभंग 'नामदेवजीकी मुखबानी' या नावाने शीख पंथाच्या पवित्र अशा 'गुरुग्रंथ साहेबमध्ये'आहेत.त्यामुळे महाराष्ट्राबरोबर राजस्थान,पंजाबमध्येही संत नामदेवांची मंदिरे आढळतात.शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून संत नामदेवांचा उल्लेख करतात. विष्णुस्वामी,लध्धा,बहोरदास,केशव कलाधारी आदि त्यांचे पंजाबी शिष्य होते. त्यांच्या असामान्य कार्यामुळेच त्यांना `संत शिरोमणी' असे म्हणतात.संत नामदेवांचे अभंग अत्यंत रसाळ अशा भाषेत आहेत.संत नामदेवांनी खऱ्या अर्थांनी भागवत धर्माचा प्रसार महाराष्ट्राबाहेर केला.


    संत नामदेवांचे काही रसाळ अभंग पुढे आहेत,
    अमृताहुनी गोड नाम तुझे देवा

    अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
    मन माझे केशवा का बा न घे

    सांग पंढरीराया काय करु यांसी
    का रूप ध्यानासी न ये तुझे

    किर्तनी बैसता निद्रे नागविले
    मन माझे गुंतले विषयसुखा

    हरिदास गर्जती हरिनामाच्या किर्ती
    नये माझ्या चित्ती नामा म्हणे

    आधी रचिली पंढरी

    आधी रचिली पंढरी ।
    मग वैकुंठ नगरी ॥१॥

    जेव्हा नव्हते चराचर ।
    तेव्हा होते पंढरपूर ॥२॥

    जेव्हा नव्हती गोदा गंगा ।
    तेव्हा होती चंद्रभागा ॥३॥

    चंद्रभागेचे तटी ।
    धन्य पंढरी गोमटी ॥४॥

    नासिलीया भूमंडळ ।
    उरे पंढरीमंडळ ॥५॥

    असे सुदर्शनावरी ।
    म्हणुनी अविनाशी पंढरी ॥६॥

    नामा म्हणे बा श्रीहरी ।
    आम्ही नाचु पंढरी ॥७॥


    काळ देहासी आला खाऊ

    काळ देहासी आला खाऊ ।
    आम्ही आनंदे नाचू गाऊ ॥१॥

    कोणे वेळे काय गाणे ।
    हे तो भगवंता मी नेणे ॥२॥

    टाळ मृदुंग दक्षिणेकडे ।
    माझे गाणे पश्चिमेकडे ॥३॥

    नामा म्हणे बा केशवा ।
    जन्मोजन्मी द्यावी सेवा ॥४॥

    पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान

    पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान ।
    आणिक दर्शन विठोबाचे ॥१॥

    हेची घडो मज जन्मजन्मांतरी ।
    मागणे श्रीहरी नाही दुजे ॥२॥

    मुखी नाम सदा संतांचे दर्शन ।
    जनी जनार्दन ऐसा भाव ॥३॥

    नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी ।
    कीर्तन गजरी सप्रेमाचे ॥४॥
     
    सुखाचें हे सुख श्रीहरी मुख

    सुखाचें हे सुख श्रीहरी मुख ।
    पाहतांही भूक तहान गेली ॥१॥

    भेटली भेटली विठाई माऊली ।
    वासना निवाली जिवांतील ॥२॥

    चंद्रासी चकोर मेघासी मयूर ।
    वाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥

    नामा म्हणे पाप आणि ताप दुख गेले ।
    जाहलें हें सुख बोलवेना ॥४॥

    विठ्ठल आवडी प्रेमभावो

    विठ्ठल आवडी प्रेमभावो ।
    विठ्ठल नामाचा रे टाहो ॥१॥

    तुटला हा संदेहो ।
    भवमूळ व्याधीचा ॥२॥

    म्हणा नरहरी उच्चार ।
    कृष्ण हरी श्रीधर ।
    हेची नाम आम्हा सार ।
    संसार करावया प्रेमभावो ॥३॥

    नेणो नामाविण काही ।
    विठ्ठल कृष्ण लवलाही ।
    नामा म्हणे तरलो पाही ।
    विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥३॥



    १.मंगलाचरण अभंग

    प्रथम नमू गजवदनु । गौरीहराचा नंदनु सकळ सुरवरांचा वंदनु ।
    मूषकवाहनु नमियेला ॥१॥

    त्रिपुरावधीं गणाधिपति । हरें पूजिला भावें भक्ति ।
    ऎके बाणें त्रिपूरा पाडिला क्षितीं । तैं पशुपति संतोषला ॥२॥

    इंद्रादिकीं अष्टलोकपाळीं । लंबोदरु पुजिला कनककमळीं ।
    त्यासी प्रसन्न झाला तयेवेळीं । म्हणवूनि सकळीं पूजियेला ॥३॥

    सटवें रात्रीं मदनु शंभरें नेला । प्रद्युन्न समुद्रामाजीं टाकिला ।
    तैं कृष्णें विघ्नहरु पूजिला । प्रद्युन्न आला रतीसहित ॥४॥

    पूजिला साही चक्रवर्ति । त्यांचिया पुरतीआर्ती ।
    युधिष्ठरें पूजिला चतुर्थी । राज्यप्राप्ति झाली तया ॥५॥

    म्हणवूनि सुरवरीं केली पूजा । त्रिभुवनीं आणिक नाहीं दुजा ।
    विष्णुदास नामा म्हणे स्वामी माझा । भावें भजा एकदंता ॥६॥

    २ .मंगलाचरण अभंग

    गणेश नमूं तरी तुझाचि नाचणा । म्हणोनि नारायणा नमन तुज ॥१॥

    सारजा नमूं तरी ते तुझी गायनी । म्हणोनि चक्रपाणी नमन तुज ॥२॥

    ब्रह्मा नमुं तरी तो तुझिये कुशीं । म्हणोनी हृषीकेशी नमन तुज ॥३॥

    शंकर नमूं तरी तो तुझी विभूति । म्हणोनि कमळापति नमन तुज ॥४॥

    वेद नमूं तरी तुझाचि स्थापिता । म्हणोनि लक्ष्मीकांता नमन तुज ॥५॥

    इंद्र नमुं तरी तुझिया त्या भुजा । म्हणोनि अधोक्षजा नमन तुज ॥६॥

    गंगा नमूं तरी ती तुझे अंगुष्ठीं । म्हणोनि जगजेठी नमन तुज ॥७॥

    लक्ष्मी नमुं तरी ते तुझे पायातळीं । म्हणोनि वनमाळी नमन तुज ॥८॥

    नामा म्हणे भेटी जाहली पैं राया । कोण गणी बायां सेवकासी ॥९॥


    ३ .मंगलाचरण अभंग

    गाणें जरी म्हणों तरी गणेश शारदा । आणीक नाही दुजा यावांचुनी ॥१॥

    नाचेन म्हणूं जरी तांडव महेश्वरु । तोही नृत्य करुं जाणे एक ॥२॥

    बोलूं म्हणों जरी बोलके वाचा चारी ।त्या एकाची उरी मग मी बोलों ॥३॥

    जाणों म्हणे जरी अठराहि जाणे । त्या पैं काय उणें मग मी जाणों ॥४॥

    कळावंत म्हणोंजरी चंद्रसूर्य दोन्ही । बारा सोळा गगनीं दाविताती ॥५॥

    नामा म्हणे अवघें वेंचलें । केशवें आपुलें म्हणावें मातें ॥६॥

    ४ .मंगलाचरण अभंग

    लंबोदर तुझा शोभे शुंडादंड । करीतसे खंड दुश्चिन्हाचा ॥१॥

    चतुर्थ आयुधें शोभताती हातीं । भक्ताला रक्षिती निरंतर ॥२॥

    भव्य रुप तुझें उंदीरवाहना । नमन चरणा करीतसे ॥३॥

    नाम घेतां तुझें दोष जळताती । कळिकाळ कांपती तुझ्या नामें ॥४॥

    चौदा विद्या तुझ्या कृपेनें येतील । मुके बोलतील वेद्‌घोष ॥५॥

    रुणझुण पायीं वाजताती वाळे । देखोनी भुललें मन माझें ॥६॥

    भक्तवत्सला तूं पार्वतीनंदना । मस्तक चरणां ठेवितसें ॥७॥

    नामा म्हणे आतां देई मज स्फूर्ती । वर्णितसे कीर्ति कृष्णजीची ॥८॥

    ५ .मंगलाचरण अभंग

    सरस्वती माते द्यावी मज स्फुर्ती । येतों काकुळती तुजलागी ॥१॥

    लाडके लाडिवाळ मागतसें तुज । वंदीतसे रज चरणींचे ॥२॥

    त्वरें येवोनियां शिरी ठेवीं हात । जाईल ही भ्रांत तेव्हां माझी ॥३॥

    आपुल्या बाळासी धरा आतां हाती । न करी फजिती जनांमध्ये ॥४॥

    विश्वात्मा जो हरी त्याची वर्णी कीर्ति । आवडीचा ओती रस मायें ॥५॥

    ऐकोनियां स्तव झालीसे प्रसन्न । नाम्या तव अभिमान मजलागीं ॥६॥
    ६ .मंगलाचरण अभंग

    प्रल्हाद नारद पराशर पुंडलीक । व्यास आणि वाल्मिक नमीयले ॥१॥

    बगदालभ्य तो भीष्म अंबरीष शौनक । ब्रह्मनिष्ठ शुक नमीयले॥२॥

    रुक्मांगद अर्जुन वसिष्ठ बिभीषण । केलेंसे नमन तयालागीं ॥३॥

    टीकाकार श्रीधर बहिरंभट चतुर । करा निरंतर कृपा मज ॥४॥

    साधुसंतसिद्ध शिरीं ठेवा हात । वर्णीन समस्त कृष्णलीला ॥५॥

    नामा मनीं आठवीं खेचरचरण । तयाच्या कृपेनें सिद्धि जावो ॥६॥



    ७ .मंगलाचरण अभंग

    देव आदिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐकें वासुदेवा दयानिधे ॥१॥

    ब्रह्म आणि इंद्रा वंद्य सदाशिवा । ऐकें वासुदेवा दीनबंधु ॥२॥

    चौदा लोकपाळ करिती तुझी सेवा । ऐकें वासुदेवा कृपासिंधु ॥३॥

    योगियांचे ध्यानीं नातुडसी देवा । ऐकें वासुदेवा जगद्‌गुरु ॥४॥

    निर्गुण निराकार नाहीं तुज माया । ऐकें कृष्णराया कानडिया ॥५॥

    करुणेचा पर्जन्य शिंपी मज तोबा । ऐकें कृष्णराया गोजरीया ॥६॥

    नामा म्हणे जरी दाखविसी पाया । तरी वदावया स्फूर्ति चाले ॥७॥

    ८ .मंगलाचरण अभंग

    क्षीरसागरांत अससीं बैसला । धांवोनी मजला भेटी देई ॥१॥

    कैलासीचा शिव पूजितो तुजला । धांवोनी मजला भेटी देई ॥२॥

    शेषावरी जरी अससी निजला । धांवोनि मजला भेटी देई ॥३॥

    गहिवंरोनि नामा बाहात तुजला । धांवोनि मजला भेटी देई ।४॥

    ९ .मंगलाचरण अभंग

    चक्रवाक पक्षी वियोगें बहाती । झालें मजप्रती तैसें आतां ॥१॥

    चुकलिया माय बाळकें रडती । झालें मजप्रती तैंसे आतां ॥२॥

    वत्स न देखता गाई हंबरती । झालें मजप्रती तैंसे आतां॥३॥

    जीवनावेगळे मत्स्य तळमळती । झालें मजप्रती तैंसे आतां ॥४॥

    नामा म्हणे मज ऐसें वाटे चित्तीं । करीतसे खंती फार तुझी ॥५॥

    No comments:

    Post a Comment