• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    महाराष्ट्रातील सन व उत्सव

    महाराष्ट्रात प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.मराठी नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्याने होते.त्यामुळे मी गुढीपाडव्याच्या सणापासून ते पुढे येणार्‍या प्रत्येक मराठी सणांची माहिती देणार आहे.

    गुढीपाडवा

    गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे.सर्व लोक दारापुढे गुढया तसेच तोरण उभारून गुढीची पुजा करतात.चौदा वर्षाच्या वनवासानंतर प्रभू श्री राम याच दिवशी अयोध्याला परत आले तेव्हा लोकांनी त्यांचे स्वागत गुढ्या उभारून केले.सकाळच्या मंगल समयी बांबूची काठी स्वच्छ करून,टोकाला गडू-तांब्या बांधला जातो तसेच साखरेची आणि फुलाची माळ बांधली जाते.गुढी सभोवती सुंदर रांगोळी काढली जाते.गुढी दिवशी कडूनिंब व गुळ खावयाची प्रथा आहे.यादिवशी नवीन संकल्प केला जातो.
    gudi_padwa




    वटपौर्णिमा

    सात जन्मी हाच पती लाभावा यासाठी ज्येष्ठ महिन्यात येणार्‍या शुद्ध पौर्णिमेला विवाहीत स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात.सत्यवानाला,सावित्रीने मृत्युच्या दाढेतून खेचून आणले होते.त्याचप्रमाणे आपल्या पतीवर कोणतेही संकट येऊ नये तसेच वडाच्या दीर्घायुषी झाडाप्रमाणे आपल्या पतीला दीर्घायुषं लाभो अशी भावना मनी ठेवून स्त्रिया हे व्रत करतात.
    watpournima





    आषाढी एकादशी

    महाराष्ट्रातील लाखो वैष्णव आषाढीला पंढरपूरला विठोबाला भेटावयास जातात.लाखो वैष्णवाचा मेळा चंद्रभागेतीरी जमलेला असतो.आषाढी एकादशीला पंढरपूरला विविध ठिकाणाहून दिंड्या येतात.यात सर्व जातीधर्माचे लोक सामील असतात.दिंडीचा इतिहास खूपच जुना आहे.

    इसवी सन १२९१ मध्ये आषाढी एकादशीला आळंदीहून पंढरपूरला पहिली दिंडी गेली होती.आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची,देहूतून संत तुकाराम,तेरहून संत गोरा कुंभारांची,सासवडहून सोपान देवांची,औंढ्या नागनाथहून संत विसोबा खेचरांची,पैठणहून संत एकनाथंची,मेहूणहून संत मुक्ताबाईंची, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ अशा विविध दिंड्या ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला निघतात तर आषाढ शुक्ल दशमीला पंढरपूरला पोहचतात.शिवकालात अनेक वारकरी लोक राजेंच्या सैन्यात होते.
    dindi3






    नागपंचमी

    नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात शुक्ल पंचमीला येतो.याच कालावधीत शेतीची मशागतीची कामे केली जातात त्यामुळे शेतात आढळणार्‍या नागाचे रक्षण करण्याचा संदेश या सणाद्वारे दिला जातो कारण नाग आदि सर्प पिकांची नासाडी करणार्‍या उंदीर,घुशींचा बंदोबस्त करतात.

    या सणादिवशी झिम्मा,फुगडी यांसारखे पारंपरिक खेळ खेळले जातात.दुध आणि मका व जोंधळाच्या लाह्याचा नैवेद्य यावेळी नागाला दाखविला जातो.खेडेगावात या सणाला विशेष महत्व आहे.सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या गावात तर जिंवत नागाची पुजा केली जाते.
    nag_panchmi





    नारळी पौर्णिमा

    श्रावणात येणारा हा सण कोळी बांधवांचा सर्वात मोठा सण आहे.समुद्रात मासेमारीसाठी जाण्यासाठी कोळी बांधव समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करून शांत होण्याची,वादळापासून संरक्षण करण्याची प्रार्थना करतो.

    या सुमारास नारळाचे गोड पदार्थ घरी केले जातात.कोळी बांधवांचे जीवन मासेमारीवर अवलंबून असते त्यामुळे हा सण त्यांच्यासाठी खास असतो.





    गोकुळाष्टमी

    श्रावणातील कृष्ण अष्टमीला हा उत्सव साजरा केला जातो.श्रीकृष्णाचे स्मरण करून हा दिवस साजरा केला जातो.उंचावर दहिहंडी बांधून त्या फोडल्या जातात.आजकाल या उत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप आले आहे.प्रामुख्याने मोठ्या शहरात हा उत्सव उंचावर दहिहंडी बांधून साजरा केला जातो.दहिहंडी फोडावयास विविध ठिकाणची गोविंदाची पथके येतात.दहिहंडी फोडण्यसाठी लाखोंची बक्षिसे संयोजकाकडून ठेवली जातात.
    dahi_handi





    पोळा

    श्रावणी अमावास्येला बैलांना स्वच्छ धुऊन त्यांची शिंगे रंगविली जातात.त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो.या दिवशी बैलांना कामावर जुंपत नाहीत त्यांना कामातून विश्रांती दिली जाते.बैलांना सजवून त्यांची सवाद्य मिरवणूक काढली जाते.घरातील सुवासनीकडून बैलाची पुजा केली जाते.कोकणात या उत्सवाला बेंदूर असेही नाव आहे.
    bail_pola






    गणेशोत्सव

    गणेशोत्सव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे.भाद्रपद महिन्यात घरात गणेशाची प्रतिष्ठापना करतात.सार्वजनिक गणेश मंडळे सुध्दा गणेशाची मोठ्या मंडपात प्रतिष्ठापना करतात.दररोज गणेशाला सकाळ -संध्याकाळ आरती करून नैवेद्य दाखविला जातो.या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.दूर्वा,मोदकांचा नैवैद्य,विविध प्रकारची फुले,पंचाअमृत गणेशाला दररोज अर्पण केली जाते.याच कालावधीत गौरीची आगमन होते.

    गणेश आणि गौरीचे विसर्जन दहा दिवस,सात दिवस,पाच दिवस अथवा दीड दिवसानंतर केले जाते.या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती-धर्माचे लोक भेदभाव विसरून गणेशाचे स्वागत करतात.तर गणेश विसर्जनानंतर 'गणपत्ती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' म्हणून गणेशाला साकडे घालतात.
    lalbagcha_raja







    विजयादशमी(दसरा)

    दसरा सण मोठा आनंदाला नाही तोटा असेही या सणाबद्दल म्हटले जाते.या सणाच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटली जातात.कोल्हापूरमध्ये हा उत्सव शाही पध्दतीने साजरा केला जातो.या दिवशी कोल्हापूरचे राजे ऐतिहासिक अशा दसरा चौकात सर्व जनतेसोबत सोने लुटतात.

    याच दिवशी श्रीरामाने रावणाचा नाश केला होता.या विजयाची आठवण येण्याकरिता ठिकठिकाणी रावणाच्या पुतळ्यांचे दहन केले जाते.हिंदूसंस्कृतीमधील साडेतीन मुहूर्तापैकी हा एक असल्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे.या दिवशी नवीन कामांची सुरुवात केली जाते.
    ram_lila








    दीपावली

    संपुर्ण भारतभर साजरा केला जाणारा हा सण आहे.परदेशात राहणारे हिंदू बांधवही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.दीपावली म्हणजे दिव्यांचा सण.अंधार जाऊन आपल्या आयुष्यात सुखसमृध्दी येऊदे अशी प्रार्थना लोक करतात.दिवे लावून हा सण साजरा केला जातो.

    धनत्रयोदशी,नरकचतुर्दशी,बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे दीपावलीतील वेगवेगळे दिवस आहेत.धनत्रयोदशीला लोक आयुर्वेद शास्त्राचा प्रवर्तक धन्वंतरी याची पुजा करतात.नरकचतुर्दशीला पहाटे तेल व सुवासिक उटणे लावून अभ्यंग स्नान केले जाते. लक्ष्मीपूजन च्या दिवशी लक्ष्मीच्या प्रतिमेसोबत दागिने ठेऊन पुजा केली जाते.भाऊबीजला भाऊ आपल्या बहिणीकडून ओवाळून घेतो व तिचे सदोदित रक्षण करील असे वचन तो तिला देतो.
    dipawali






    मकर संक्रात
    सूर्याने मकर राशीत प्रवेश करण्याचा कालावधी ज्या दिवशी होतो तो दिवस मकर संक्रात म्हणून साजरा केला जातो.या कालात दिवस मोठा व रात्र लहान असते.या काळात मित्रांना भेटवस्तू द्यावयाची प्रथा असते तसेच या कालावधीत तीळ आणि गूळाचे लाडू अथवा तीळगुळ एकमेकांना देण्याची पद्धत आहे.

    तीळ व गुळ पौष्टिक तसेच उष्ण असतो त्यामुळे शरीरास आवश्क ती उष्णता यान्वये मिळते.लोक एकमेकांना तीळगूळ घ्या-गोड बोला असे म्हणून आपसांमधील मतभेद संपवितात.
    makar_sankranti

    No comments:

    Post a Comment