• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    संत ज्ञानेश्वर

    संत ज्ञानेश्वराचां जन्म (इ.स.१२७५)साली आळंदी येथे झाला.सर्वसामान्य लोकांना भगवद् गीता समजण्यासाठी त्यांनी संस्कृतमधून मराठीमध्ये भावार्थदीपिका या नावाने तिचे भाषांतर केले.ज्ञानेश्वरी या नावाने ते प्रसिद्ध आहे.सदर महान कार्य त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.याशिवाय त्यांनी 'अमृतानुभव' आणि 'चांगदेवपासष्टी' हे ग्रंथ व अनेक अभंगगाथा आपल्या अल्प अशा कालावधी मध्ये लिहिल्या.
    मुळचे नाव:ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी
     
    जन्मठिकाण:आळंदी(महाराष्ट्र)इ.स.१२७५

     
    समाधी:आळंदी(महाराष्ट्र)इ.स. १२९६

     
    ग्रंथ:'भावार्थदीपिका'('ज्ञानेश्वरी'),'अमृतानुभव',
    'चांगदेवपासष्टी' व शेकडो मराठी अभंग

     
    गुरूबंधू:संत निवृत्तीनाथ

           संत ज्ञानेश्वर                                                  



    संत ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांनी (विठ्ठलपंत-रुक्मिणीबाई)यांनी संन्यासाश्रम त्यागून गृहस्थाश्रमाचा स्वीकार केलेला असल्यामुळे तत्कालीन समाजाने या कुटुंबाला वाळीत टाकले,मुलांना त्रास होऊ नये यासाठी विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांनी देहत्याग केला.माधुकरी मागून राहात असलेल्या चारही भावंडाचा(संत निवृतीनाथ,संत सोपानदेव,संत ज्ञानेश्वर व संत मुक्ताबाई)सनातन धर्ममार्तंडानी छळ केला.या छळास कंटाळून संत ज्ञानेश्वर आपल्या झोपडीचे दार बंद करून बसत,अशावेळी संत मुक्ताबाई आपल्या वडिलबंधूची समजूत घालत,हेच संत मुक्ताबाईचे ताटीचे अभंग म्हणून प्रसिध्द आहेत.

     
    संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात केला.सर्वसामान्यांना समजेल असा रसाळ भाषेत त्यांनी अभंग रचना केली.ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी लिहिले आहे,

    ओम नमोजी आद्या। वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरुपा॥१॥

    हे मुलस्वरुप ओंकारा,ज्याच्या बद्दल वेदामध्ये वर्णन केले आहे ,तुला माझा प्रणाम,तुझ्याबद्दल तूच जाणू शकतेस कारण तू आत्मरुप आहेस.


    ज्ञानेश्वरांचे काही सुंदर अभंग पुढीलप्रमाणे आहेत.
    १.अजि सोनियाचा दिनु
    अजि सोनियाचा दिनु ।
    वर्षे अमृताचा घनु ॥१॥
    हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।
    सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥
    दृढ विटे मन मुळी ।
    विराजित वनमाळी ॥३॥
    बरवा संतसमागमु ।
    प्रगटला आत्मारामु ॥४॥
    कृपासिंधु करुणाकरू ।
    बाप रखमादेविवरू ॥५॥
    २.विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले
    विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले।
    अवघे चि जालें देह ब्रम्ह ॥१॥
    आवडीचें वालभ माझेनि कोंदटलें।
    नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥
    रखुमादेवीवरू सहज नीटु जाला ।
    हृदयीं नीटावला ब्रम्हाकारें ॥३॥

    ३.मोगरा फुलला मोगरा फुलला
    इवलेंसे रोप लाविलें द्वारी ।
    त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥१॥
    मोगरा फुलला मोगरा फुलला ।
    फुलें वेंचितां अतिभारू कळियांसी आला ॥२॥
    मनाचिये गुंती गुंइफियेला शेला ।
    बाप रखुमादेविवरू विठ्ठलीं अर्पिला ॥३॥
    ४ .ॐ नमोजी आद्या
    ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥
    जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥
    देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ।
    म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥
    अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ॥
    मकार महामंडल । मस्तकाकारें ॥३॥
    हे तिन्ही एकवटले । तेथें शब्द्ब्रम्ह कवळलें ॥
    ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें । आदिबीज ॥४॥
    आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थ कलाकामिनी ॥
    ते श्रीशारदा विश्वमोहिनी । नमिली मीयां ॥५॥


                                                                   ५.पैल तो गे काऊ कोकताहे

    पैल तो गे काऊ कोकताहे।
    शकुन गे माये सांगताहे ॥१॥
    उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
    पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥
    दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
    जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥
    दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
    सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
    आंबया डाहाळी फळें चुंबी रसाळीं ।
    आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥
    ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।
    भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥
    ६ .घनु वाजे घुणघुणा
    घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा ।
    भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा का ॥१॥
    चांदु वो चांदणे । चांपेवो चंदनु ।
    देवकीनंदनु । वीण अणू नावडे वो ॥२॥
    चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी ।
    कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा कां ॥३॥
    सुमनाची सेज । सितळ वो निकी ।
    पोळे आगीसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥
    तुम्ही गातसां सुस्वरे । ऐकोनि द्या उत्तरे ।
    कोकिळें वर्जवें । तुम्हीं बाईयांनो ॥५॥
    दर्पणी पाहतां । रूप न दिसे आपुलें ।
    बाप रखुमादेवीवरें । विठ्ठलें मज ऐसें केलें ॥६॥
    ७.अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू
    अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू ।
    मी म्हणु गोपाळू, आला गे माये ॥१॥
    चांचरती चांचरती बाहेरी निघाले ।
    ठकचि मी ठेलें काय करू ॥२॥
    तो सावळा सुंदरू कासे पितांबरू ।
    लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥
    बोधुनी ठेलें मन तव जालें आन ।
    सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥
    बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा ।
    तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५॥
    ८ .रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा
    रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा
    सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥१॥
    चरणकमळदळू रे भ्रमरा ।
    भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥२॥
    सुमनसुगंधु रे भ्रमरा ।
    परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥३॥
    सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा ।
    बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥४॥

    ९.रंगा येईं वो येईं, रंगा येईं वो येईं
    रंगा येईं वो येईं, रंगा येईं वो येईं।
    विठाई किटाई माझे कृष्णाई कान्हाई ॥१॥
    वैकुंठवासिनी विठाई जगत्र जननी ।
    तुझा वेधु माझे मनी ॥२॥
    कटी कर विराजित मुगूट रत्‍न जडित ।
    पीतांबरू कसिला तैसा येऊ का धांवत ॥३॥
    विश्व-रूपे विश्वं-भरे कमल-नयनें कमलाकरे वो ।
    तुझे ध्यान लागो बाप रखुमादेवीवरे वो ॥४॥
    १० .देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी
    देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी
    तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
    हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
    पुण्याची गणना कोण करीं ॥२॥
    असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं ।
    वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
    ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ।
    द्वारकेचे राणे पांडवांघरीं ॥४॥


    ज्ञानेश्वरांनी ,भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी )या ग्रंथाचा शेवट अत्यंत रसाळ अशा पसायदानाने केलेला आहे.पसायदान व प्रत्येक ओवीचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.

                                                 पसायदान(ज्ञानेश्वरी अध्याय १८ ओवी १७९४ ते १८०२)
    आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
    तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
    १.आता विश्वात्मक देवाने या माझ्या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला हे पसानदान (प्रसाद) द्यावे.

    जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
    भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
    २.दुष्टांचे दुष्टपण नाहीसे होवो,त्यांना सत्कर्मे करण्याची बुध्दी होवो,सर्व प्राणीमात्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण होवो.

    दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
    जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
    ३.पापी लोकांचा अज्ञानरूपी अंधार नाहीसा होवो,विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होवो.प्राणीमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत.

    वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
    अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
    ४.सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ संत पृथ्वीवर अवतरत जावोत आणि प्राणिमात्रांना भेटत जावोत.

    चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव,
    बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
    ५.जे कल्पतरूंची चालती बोलती उद्याने आहेत,चेतनारूपी चिंतामणी रत्नांची जमू गावेच आहेत,अमृताचे बोलणारे समुद्रच आहेत.

    चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
    ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
    ६.जे कोणताही डाग नसलेले निर्मळ चंद्रच आहेत,तापहीन सूर्यच आहेत असे संत सज्जन सर्व प्राणीमात्राचे मित्र होवोत.

    किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
    भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
    ७.तिन्ही लोकांनी सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन अखंडीतपणे विश्वाच्या आदिपुरूषाची सेवा करावी.

    आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
    दृष्टादृष्टविजये, होआवेजी ॥८॥
    ८.हा ग्रंथ ज्याचे जीवन आहे ,त्यांनी या जगातील दृष्य आणि अदृष्य भोगांवर विजयी व्हावे.

    येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
    येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||
    ९.यावर विश्वेश्वर गुरू श्री निवृतीनाथ म्हणाले की हा प्रसाद तुला लाभेल.या वराने ज्ञानदेव सुखी झाला.





    No comments:

    Post a Comment